साडवली : देवरूख व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. देवरुख शहरातील वरचीआळी येथील घरफोडीची घटना ताजी असताना शुक्रवारी सह्याद्रीनगर येथील घरातून महिलेची बॅग चोरट्यांनी पळविली.
गुरुवारी (ता. ९) देवरूख बसस्थानकातून एका महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवत पलायन केले. हा प्रकार सकाळी १० च्या सुमारास घडला होता. आरडाओरडा झाल्याने हा चोरटा पर्स टाकून पोबारा करण्यात यशस्वी झाला. सीसीटीव्हीत हा चोरटा कैद झाला, मात्र या चोरट्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही. शहरातील वरची आळी येथे रस्त्यालगत साजय बांदरकर यांचे घर भरदुपारी चोरट्यांनी फोडून ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने, ५ हजार रोकड असा एकूण सुमारे ४ लाखांचा ऐवज पळविला. तसेच वनिता पवार यांचे घर चोरट्यानी फोडून २ हजारांची रोख रक्कम लांबवली. या चोरट्याचा पर्दाफाश करण्यासाठी शुक्रवारी श्वानपथक, तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटना ताज्या असताना शुक्रवारी (ता. ११) रात्री आठच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील एका घरातून चोरट्यांनी बॅग पळविली. या बॅगमध्ये ७ हजाराचे सोन्याचे टॉप्स, ३ हजार ५०० रुपयांचे कानातले, १३ हजार रुपये रोख, असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. अज्ञात चोरट्या विरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 13/Jan/2025














