रत्नागिरी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात जिल्हा वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षात ५५ हजार ३०९ वाहनचालकांना ३ कोटी ८६ लाख ५२ हजार १०० रुपयांचा दंड केला.
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे महामार्गावर तसेच शहर आणि गावातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. वाहनांचे अपघात घडू नयेत यासाठी वाहतुकीचे नियम बनवलेले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा किंवा दंड करण्याची तरतूद आहे; मात्र काही वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडतात. त्यामुळे अपघात घडतात.
दरवर्षी होणाऱ्या असंख्य अपघातात हजारो लोक जखमी होतात तर काही मृत्युमुखीही पडतात. नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांमार्फत दंडाची तरतूद केली आहे. गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट गाडी चालवताना, मोबाईलवर संभाषण, मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक, रेड सिग्नल जंपिग, विनाविमा, विनापरवाना, फॅन्सी नंबर प्लेल्ट, धोकादायकपणे वाहन चालवणे, नो-पार्किंग, चुकीचे पार्किंग, डार्क ग्लास, रहदारीला अडथळा, नो-एंट्री, ट्रीपल सीट, क्लॅडस्टाइन ऑपरेशन, दारू पिऊन गाडी चालवणे आदी गुन्हा करणाऱ्या ५५ हजार ३०९ चालकांना दंड केला आहे. येथून पुढे कारवाईची मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
प्रमाण वाढू लागलेले आहेत
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास अपघाताचा धोका वाढतो. बहुतांश अपघात वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होते. त्यात काहीवेळा त्या वाहनचालकांचा मृत्यू होतो; पण काहीवेळा निरपराध असलेल्यांचाही बळी जातो. अपघात टाळायचे असतील तर नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे तरच अपघातांचीही संख्या कमी होईल. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. – आबासाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:51 PM 13/Jan/2025














