पुस्तकांमुळे आपण माणसांशी जोडले जातो : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

रत्नागिरी : पुस्तकांमुळे आपण माणसांशी जोडले जातो. वेगवेगळ्या संस्कृतींचा आपल्याला परिचय होतो, असे प्रतिपादन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले. वाचनामुळे संवाद कौशल्य कसे विकसित होते याचेही मार्गदर्शन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत वाङमयमंडळातर्फे वाचन-संवाद कौशल्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत लेखक, समीक्षक आणि अभिवाचक म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी साधन व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मराठी वाङमय मंडळाचे समन्वयक डॉ. शिवराज गोपाळे यांनी केले. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत डॉ. निधी पटवर्धन यांनी डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांची मुलाखत घेतली.

यावेळी उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी श्रेयस पाटील याने केले तसेच प्रमुख अभ्यागत डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचा परिचय दीप भावजे याने करून दिला. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आभार डॉ. सीमा वीर यांनी मानले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालय ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल किरण धांडोरे, सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे, भाषा विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
112:30 PM 13/Jan/2025