रत्नागिरी : शिरगाव येथे बांगलादेशी नागरिकाला दिलेल्या जन्म दाखलाप्रकरणी शिफारस केलेला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
देशाच्या दृष्टीने ही घातक गोष्ट आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिलेल्या दाखल्यांची माहिती घेण्यास सांगितले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी सायंकाळी मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, बांगलादेशींना सहकार्य करणाऱ्यांना कोणालाही पाठीशी घालणार नाही. शिरगाव प्रकरणानंतर मिरकरवाडा येथेही २० दाखले तपासण्यात आले ते भारतीयच आहेत. स्थानिक मच्छीमारांना त्रास न देता बांगलादेशींना हाकलून देणे ही सर्वांची जबाबदारी असेल.”
मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, पोलिस वसाहत, स्मार्ट सिटी, प्राणी संग्रहालय, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, थ्री डी मल्टिमीडिया शो, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रांत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदी इमारतींच्या कामांचा आढावा घेतला. या कामाची परिपूर्ती डिसेंबर २०२६ पर्यंत होणार आहे.
मराठी भाषा विभाग सज्ज
राजभाषा मराठी विभाग सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्याकरिता दर ९० दिवसांनी कमिटीच्या बैठका होतील. १४ ते २८ जानेवारी मराठी भाषा पंधरवड्यात तीन मोठे कार्यक्रम होणार आहेत. तसेच २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनापूर्वी जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कार्यालये, व्यापाऱ्यांनी फलक मराठीत प्रदर्शित करावे. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना श्री. सामंत यांनी केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर














