रत्नागिरी : एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून मांडवी किनाऱ्यावर निर्माल्य संकलन

त्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील मांडवी बंदर येथे निर्माल्य संकलनाचा एक स्तुत्य उपक्रम राबवला.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी गणेश विसर्जनादरम्यान आणले जाणारे निर्माल्य समुद्रात न टाकता त्याचे स्वतंत्रपणे संकलन करण्याचे नियोजन केले. या नियोजनात मुस्लिम महिला आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

रत्नागिरी शहर, परिसर आणि जिल्हा हे सर्व जातधर्म पंथांचे एक विलक्षण मिश्रण आहे. हे ऋणानुबंध गेल्या अनेक शतकांचे आहे. येथील हिंदू-मुस्लिम समाज सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. शिवाय, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मांडवी समुद्रावर निर्माल्य संकलनात सहभागी झालेले होते. महाविद्यालयाने सामाजिक भान जपण्याचे आणि ते वृद्धिंगत करण्याचे काम केले आहे. यासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी नियोजन केले होते. गणेश विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात फुले, हार, फळे, दूर्वा आणि अन्य साहित्य विसर्जित केले जाते. त्यामुळे समुद्रामध्ये विसर्जित केलेले निर्माल्य प्रचंड प्रमाणामध्ये जमा होते. ते बऱ्याचवेळा अनेकांच्या पायदळी तुडवले जाण्याची शक्यता असते. कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. पाणी दूषित होऊ नये, या उद्देशाने निर्माल्य संकलन उपक्रम गेली १० वर्षे राबवण्यात येतो. गणेश विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात न टाकता या संकलन केंद्रावर जमा करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 17-09-2024