रत्नागिरी : राज्यस्तरीय नवोपक्रममध्ये नाखरे नं. १ शाळा जिल्ह्यात व्दितीय

पावस : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ ने जिल्हास्तरावर द्वितीय नामांकन मिळविले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) रत्नागिरी आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या वतीने झालेल्या मूल्यांकनात नाखरे शाळेने अभ्यास मंडळ, देई गुणवत्तेला पाठबळ हा नवोपक्रम सादर केला.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक शाळेत विविध उपक्रम राबवित असतात. त्या उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण होऊन राज्याचा शैक्षणिक दर्जा वृद्धिंगत होणेकामी उपयोग व्हावा, यादृष्टीने अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, विषय सहाय्यक, डायट अधिव्याख्याता यांचेसाठी प्रतीवर्षी या स्पर्धेचे आयोजन शासनाच्यावतीने केले जाते.

या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी यश प्राप्त करणाऱ्या नाखरे शाळेचे आणि उपक्रम प्रमुख शिक्षक सुहास वाडेकर यांचे माजी सरपंच, उपसरपंच विजय चव्हाण, निर्मल ग्रामपंचायत नाखरे सरपंच विद्या जाधव आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास लांजेकर आणि सदस्य, मुख्याध्यापक शशिकांत घाणेकर यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, अभ्यास सवयी लागाव्यात, परीक्षेचा ताण कमी व्हावा, शाळाबाह्य जीवनाशी शिक्षण जोडावे या प्रमुख उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमास सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक राजेंद्र भिंगार्डे, श्रावणी केळकर, अंगणवाडी ताई मंगला चव्हाण यांचे सहकार्य लाभले. त्यासाठी डायट रत्नागिरीच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, सीमा इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून राबवलेल्या आणि राज्यस्तरासाठी पात्र ठरलेल्या अभ्यासमंडळ उपक्रमाचे केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी सशाली मोहिते, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, डायट प्राचार्य सुशील शिवलकर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 13/Jan/2025