रत्नागिरी : शहरातील मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण गेले चार महिने सुरू आहे. साळवी स्टॉप ते माळनाका हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ८० फुटी मार्गावरून आता एसटी स्टँडपर्यंत काँक्रिटीकरण चालू करण्यात आले आहे. आता एसटी स्टँड परिसरात हे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. जवळच बाजारपेठ, जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने या मार्गावर सकाळी शाळा, कार्यालये भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे.
वाहतूक पोलिस कार्यरत असले तरी दुचाकीस्वार ओव्हरटेक करत असल्याने वाहतूक मंदावते, याचा फटका साऱ्यांनाच बसू लागला आहे.
काँक्रिटीकरणाचे काम बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस केले जाते. सुरुवातीला डांबरीकरणाचा एक थर व नंतर कॉक्रिटीकरण केले जाते. ८० फुटी मार्गावरून बंदररोड नाक्यावर व तिथून पुढे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मध्यवर्ती एसटी स्टँडपर्यंतचा महत्त्वाचा व गजबजलेला भाग आहे. या भागात गेल्या चार दिवसांपासून काम सुरू झाले असून, आता येथे तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवार आठवडा बाजारच्या दिवशी तर येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.
अनेकदा दुचाकीस्वार त्याच्या पुढील एसटी बस, रिक्षा, चारचाकी वाहनांना ओव्हरटेक करून पुढे जाऊन थांबतात. त्यामुळे मागील वाहनांना पुढे जाण्यास थांबावे लागते. समोरून मोठी गाडी येत असल्यास आणखी अडचण निर्माण होते. त्यामुळे शिस्तीत वाहन चालवा, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतूक पोलिसही या विकाणी वर्दळीच्या वेळेस कार्यरत असतात.
तरीही वाहतुकीचे नियोजन करताना त्यांची चांगलीच दमछाक होत असते. दिवसेंदविस वाढती लोकसंख्या त्या पाठोपाठ वाढणाऱ्या वाहनांची संख्येमुळे या वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करुन दुहेरी मागनि वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
या मार्गाचा वापर करा…
एसटी स्टँड किंवा खालच्या भागात जायचे असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, जयस्तंभ येथून तेलीआळीकडे जाणारा मार्ग आहे. जेलरोड येथून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून गाडीतळाकडे जाणारा मार्ग आहे. नाईक स्कूलकडून पोलिस अधीक्षक निवासस्थान व जीएसटी भवनकडून फगरवतार, परटवणे या मार्गाचा वापर करता येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 14/Jan/2025














