कर्दे गावाचा पुरस्कार म्हणजे कोकणातील कृषी पर्यटनाचे प्रतिनिधित्व : सरपंच सचिन तोडणकर

रत्नागिरी : कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी मिळालेला पुरस्कार संपूर्ण कोकणातल्या कृषी पर्यटनाचे प्रतिनिधित्व करतो, अशी भावना सरपंच सचिन तोडणकर यांनी व्यक्त केली.

विविध आठ श्रेणींमध्ये देशभरातील ३६ गावांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार कर्दे (ता. दापोली) गावाला मिळाला. देश पातळीरील ही स्पर्धा दूरस्थ पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये गावातील उपक्रमांसंदर्भातील सादरीकरण कर्दे गावाचे सरपंच सचिन तोडणकर यांनी केले होते. नवी दिल्ली येथे शुक्रवारी हा पुरस्कार श्री. तोडणकर यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. स्पर्धेत सहभागी झालेली ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली.

किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या २०२३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्यांच्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धन, समुदाय-आधारित पर्यटन आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 30-09-2024