कोकण रेल्वेभरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या : शौकत मुकादम

चिपळूण : कोकण रेल्वेतर्फे विविध पदांसाठी संगणकाद्वारे होणारी निवड चाचणी परीक्षा ही पारदर्शक असावी, तसेच या संगणक नोकऱ्यांसाठी कोकण रेल्वेमार्गासाठी जमीन गेलेल्या आणि स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, अशी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी मागणी केली. बाहेरच्या राज्यातील उमेदवार रुजू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कोकण रेल्वेच्या १९० जागांसाठी १३ ते १६ जानेवारीपर्यंत संगणकावर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रिकल अभियंते, सिव्हिल अभियंते, स्टेशनमास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, सिग्नलधारक, पर्यवेक्षक आदी जागांचा समावेश आहे. १९ जुलै १९९० मध्ये कोकण रेल्वेच्या मार्गासाठीची पायाभरणी झाली. २६ जानेवारी १९९८ मध्ये कोकण रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला. कायद्यानुसार रेल्वेमार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूरपर्यंत (कर्नाटक) कोकण रेल्वेला जमीन गेलेले ३६ हजार ७०० भूपीडित आहेत. सुमारे ३ हजार ९४ भूपीडित लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. बाकी अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. २०१९ मध्ये कोकण रेल्वेत विविध पदांसाठी झालेल्या जागा “लॅंड लूजर”ना डावलून सोलापूर व पुणे डिव्हिजनच्या उमेदवारांची रेल्वेस्टेशन मास्टरच्या पदांसाठी निवड केली होती व याची मंत्री वेणू नायर यांनी २०२१ मध्ये रत्नागिरी येथे कबुली दिली होती.

दुरुस्ती कामात दिरंगाई
ऑक्टोबर २०२४ मध्ये कंत्राटी पद्धतीने अभियंते व मेकॅनिक यांच्या मुलाखती बेलापूर येथे झाल्या होत्या. त्या वेळीही लॅंड लूझरना डावलून उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल व अशाय अन्य राज्यांतील उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्यातील बऱ्याच उमेदवारांना इंग्रजी लिहिता व वाचताही येत नाही. त्याचा परिणाम म्हणून दुरुस्तीच्या कामात बरीच दिरंगाई होते, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 14/Jan/2025