गणपती गेले तरी ‘शिधा’चा पत्ता नाही !

रत्नागिरी : सणासुदीच्या दिवसात शासनातर्फे देण्यात येणारा आनंदाचा शिधा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर स्वांतत्र्यदिन ते गणपती उत्सव या कालावधीत आनंदाचा शिधा देण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही हा शिधा दुकानात वितरित न झाल्याने आता सामान्य शिधाधारकांना आनंदाचा शिधा कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.

लोकसभा आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याचे वाटप करण्यात आले नव्हते. १५ ऑगस्ट ते गणेशोत्सव या कालावधीत लोकांना गोडधोड देण्याचे नियोजन सरकारकडून राबविण्यात आले होते. मात्र आता १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थी या शिधा वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना याहीवेळी रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असे किट १०० रुपयांत देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. मात्र आता सण निघून गेले तरी आनंदाचा शिधा मात्र दुकानात वितरीत झाला नाही. आता दिवाळी सणापूर्वी तरी या शिधाचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात १५ लाख लाभार्थी

राज्यातील दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना सण-उत्सव काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य नाममात्र दरात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थीना आनंदाच्या शिधाचा लाभ मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 30-09-2024