‘राजकारणात प्रवाहानुसार वागावे लागते’

चिपळूण : राजकारणामध्ये राजकीय प्रवाहानुसारच वागावे लागते. हल्ली निवडणुकांचे तंत्रही बदलले आहे. लोकांची कामे भरपूर केली म्हणून लोक मतदान करतीलच, असे नाही. त्याचेही एक वेगळे शास्त्र आहे, हे आता लक्षात आले आहे. त्यामुळे भूमिका घेऊन काम करणाऱ्या आणि स्पष्ट वक्तेपणा असामान्य लोकप्रतिनिधींना राजकारणात नुकसानच जास्त संभवते, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव व आमदार शेखर निकम यांनी पेढे येथील सत्कार कार्यक्रमात केले.

तालुक्यातील पेढे-परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ आणि पेढे-परशुराम पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार निकम व आमदार जाधव यांचा नागरी सन्मान सोहळा पेढे येथील काळे माध्यमिक विद्यालयात झाला. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आमदार जाधव यांचा तर सुनील गमरे यांच्या हस्ते आमदार निकम यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन संदेश पवार यांनी केले. आमदार जाधव म्हणाले, मी या भागाचा आमदार नसताना माझ्या कामाप्रती आदर ठेवून हा सन्मान केल्याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. आमदार निकम म्हणाले, शिक्षणसंस्थेने मानपत्र देऊन खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी निश्चितपणे आम्ही पार पाडू. या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, संस्थेचे सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष गोपीनाथ रेपाळ, राकेश शिंदे, पेढे सरपंच आरुषी शिंदे, परशुराम सरपंच गायत्री जोगले, वालोपेचे सरपंच प्रतीक सुर्वे, धामणदेवीच्या सरपंच संजीवनी नरळकर, मजरेकाशी सरपंच रूपाली पेडणेकर, उपसरपंच प्रतीक गुरव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 14/Jan/2025