चिपळूण : नऊनंतर शाळेच्या शासन निर्णयाकडे अनेक संस्थांची बगल

चिपळूण : लहान मुलांच्या शाळा या सकाळी नऊनंतर सुरू कराव्यात, या शासन निर्णयाला अनेक शाळांनी हरताळ फासला आहे. काही शाळांनी शासन निर्णयानुसार वेळेत बदल केला आहे. शाळेने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दुपारी एक ते सायंकाळी ६ आणि पूर्व प्राथमिकचे वर्ग सकाळी नऊ ते दुपारी बाराच्या दरम्यान भरवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने याबाबत “जीआर” काढून लहान मुलांच्या शाळा या सकाळी ९ नंतर सुरू कराव्यात, असे आदेश दिले आहेत; मात्र अनेक शाळांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. चिपळूण शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील खासगी शिक्षणसंस्थांच्या शाळा सकाळी भरतात. यामुळे रोज सकाळी लहान मुलांची झोपमोड करून त्यांना उठवले जाते. सकाळी सातची शाळा असल्याने नोकरदार महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात. शाळांची वेळ सकाळी सात वाजता असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. अनेकदा लहान मुलांना उठायला उशीर होतो. त्यामुळे पालक हे मुलांना दमदाटी करून उठवतात ज्यामुळे मुलांची झोपमोड होते. कधी कधी मुले शाळेत जाण्यास नकार देतात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होते.

लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊनंतर सुरू करण्याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल; मात्र याबाबत शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. पालकांच्या वतीने तक्रार होत नाही तोपर्यंत त्यांचा त्रास समजणार नाही. —दादासाहेब इरणाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 14/Jan/2025