Ratnagiri : तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

◼️ कोळंबे येथील शिक्षण संस्थाध्यक्षासह तिघांवर गुन्हा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष नयन मुळ्ये (६८), त्याचा मुलगा प्रथमेश मुळ्ये तसेच मुख्याध्यापक संजय मुळ्ये या तिघांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शहर पोलिस ठाण्यातून संगमेश्वर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा संगमेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणातील
तिन्ही मुली गणपती सुट्टीदरम्यान आपल्या गावी गेल्या नव्हत्या. त्यातील एक १७ वर्षीया पीडिता ही फिर्यादी असलेल्या ग्रंथपाल महिलेकडे सुट्टीत रहाण्यासाठी गेली होती. त्यानंतर फिर्यादी आपल्या गावी गेल्यानंतर ती पीडिता ही संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांच्या घरी राहाण्यासाठी गेली असताना संशयित नयन मुळ्ये याने तिचा विनयभंग केला तर त्याच्या मुलाने पीडितेला धमकाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या बाबत मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीडितेने गणपती सुट्टीनंतर घडलेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेला सांगितला, असे तिने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोन पीडितांचा विनयभंग कोठे करण्यात आला, याचा तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.

मुलींच्या वसतिगृहाला मान्यता नाही
या संस्थेतील मुलांच्या वसतिगृहाला शासनाची परवानगी आहे. परंतु, मुलींच्या वसतिगृहाला परवानगी नसतानाही संशयितांनी अनधिकृतपणे मुलींचे वसतिगृह सुरू केले असून त्यात सध्या एकूण २३ मुलींचे वास्तव्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 01/Oct/2024