खेड : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ खेड तालुक्यातील ५१३ महिलांनी घेतला. त्यामध्ये आतापर्यंत पहिले आणि दुसरे अपत्य असलेल्या महिलांना वर्षभरात १३ लाख ६५ हजार इतके अनुदान लाभार्थी मातांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना खूप गाजली; पण गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे व त्यांना सकस पोषण आहार मिळून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या हेतूने ही योजना राबवली जात आहे.
गरोदरपण व बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवासुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता व बालआरोग्य सुधारणे, हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश आहे. नवीन निकष पात्र लाभार्थी शोधून आशा किंवा अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थांची ऑनलाईन पीएमएमव्हीवाय सॉफ्टवेअरमध्ये लाभार्थी नोंदणी केली जाते. लाभार्थी पहिल्या खेपेचा असेल तर २ टप्प्यात फॉर्म भरला जातो. दुसऱ्या जिवंत अपत्याच्यावेळी मुलगी असणारे लाभार्थी असतील. त्यांचा एकच टप्प्यात फॉर्म भरला जातो याशिवाय पात्र लाभार्थी पोर्टलवर स्वतः लाभासाठी नोंदणी करू शकतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
असे आहेत योजनेचे निकष…
योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यांत ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. पहिला हप्ता ३ हजार रुपयांचा असून, त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्यकेंद्रात गर्भधारणेची नोंद झालेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपये आहे. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एकरकमी ६ हजार रुपये मदत दिली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 15/Jan/2025