लांजा : गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारी क्रेटा कार १५ फूट खोल वहाळात कोसळून अपघात झाला. कारमधून प्रवास करणारे सर्व पाच प्रवासी हे थोडक्यात बचावले. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे खत कारखान्यानजीक घडली.
मुंबई-गोवा महामार्गाचे लांजा ते वाकेड दरम्यान काम सुरू असून काही या भागात ठिकाणी पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोठे खड्डे असून बारीक खडी टाकल्याने वाहन चालकांना लगेच रस्त्याचा अंदाज येत नाही. याचाच फटका गोव्यातून ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कारला सोमवारी बसला. चालकाला अंदाज न आल्याने कार घसरून मोठ्या वहाळात जाऊन धडकली. या अपघातात कारमधील कोणालाही इजा झाली नाही. मात्र, कारचे किरकोळ नुकसान झाले. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी व शेजारील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन गाडीतील प्रवाशांना मदत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 01/Oct/2024