संदीप फटकरेंचा खून झाला असेल तर न्याय दिला जाईल : उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर

पावस : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथील एक वडापाव व्यावसायिक संदीप नारायण फटकरे यांच्या व्हिसेरा अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याने ग्रामस्थांच्या संशयानुसार संशयित व्यक्तीचा तपास सुरू असून, तपासामध्ये कोणताही खंड पडलेला नाही. खरोखरच खून झाला असेल तर त्या खुनाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करून त्यांना न्याय दिला जाईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांनी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले.

पूर्णगड पोलिस ठाण्यावरील मोर्चा रद्द झाल्यानंतर चांदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले. चांदोर तळीवाडी येथील संदीप नारायण फटकरे (वय ३३) यांचा सापुचेतळे येथील वडापावच्या गाडीजवळ मृत्यू झाला होता. हा मृत्यू ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला असल्याने ग्रामस्थांनी गावामध्ये एक बैठक घेऊन त्याच्या मृत्यूचे कारण समजावे व संशयितावर कारवाई करावी यासाठी दि. ३० सप्टेंबर रोजी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यावर न्याय हक्कासाठी ग्रामस्थ धडकणार होते. परंतु, जिल्ह्यामध्ये मनाई आदेश असल्याने ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावरील मोर्चा स्थगित केला. या पार्श्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल केदारी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली त्यानंतर काल उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे आणि पोलिस अंमलदार प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, प्रकाश झोरे आदींनी चांदोर गावाला व घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर गावातील एका प्रांगणामध्ये ग्रामस्थ एकत्र जमले होते. सुमारे साडेतीनशे ते चारशे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. माईनकर यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या संदर्भात मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी अहवाल लवकरात लवकर प्राप्त झाल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला, हे कारण स्पष्ट होणार असून श्री. फटकरे ज्या वडापावच्या गाडीजवळ पडले होते. त्या दरम्यान असलेल्या संशयित व्यक्तीचा शोध सुरू असून चौकशीचा फेरा थांबलेला नाही. गुन्हेगाराच्या मुळापर्यंत जाऊन चाची चौकशी करून फटकरे यांच्या मृत्यूला न्याय देऊ, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन झाल्याने तपासाला सहकार्य करण्याचे ग्रामस्थांनी आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 01/Oct/2024