रत्नागिरी : ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ व उत्पादाने मिळावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेवर भर देत काही अस्थापनांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तर अस्वच्छता ठेवणाऱ्या ५१ परवानाधारकांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्रुटीमध्ये सुचविलेल्या सुधारणा न करणाऱ्याा १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जणांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत.
रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये हे कारवाई केली आहे. जिल्ह्याची जबाबदारी असताना या विभागाच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. तरी चांगल्या पद्धतीने या विभागाची कारवाई सुरू आहे.
पंधराच्या वर कामगार असलेल्या परवानाधारक अस्थापनेमध्ये संबंधित कामांचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागाकडून तेथील कामगारांना प्रशिक्षित केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांशी कसे वागावे, कसे बोलावे, स्वच्छता कसी ठेवावी आदी धडे यामध्ये दिले जात आहेत. ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ आणि उत्पादने मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे ५६ लाख २३ हजार परवानाधारक आहेत, त्यांनी दिलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या नूतनीकरणातूनच या विभागाला उत्पन्न मिळते. परवाना नूतनीकरणाच्या शुल्कातून १७ लाख ६६ हजार ५०० एवढा महसूल मिळविला आहे.
या विभागाकडून झालेल्या तपासणीत अस्वच्छता ठेवलेल्या ५१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार १०० एवढी दंडाची रक्कम वसूल केली आहे. अस्वच्छता आढळून आलेल्या अस्थापनेला या विभागाने सुधारणा सूचविल्या होत्या, त्या पूर्ण न केलेल्या १५ जणांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. कारणे दाखवा नोटीस देऊनही सुधारणा न केलेल्या ६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 01/Oct/2024














