रत्नागिरी एज्यु. सोसायटीसाठी कार्यकर्ता म्हणून कायम पाठीशी : आ. निरंजन डावखरे

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी विद्यादानाचे काम गेली १०० वर्षे सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या विविध करिअर संधीसाठी संस्थेची नेहमीच तळमळ राहिली आहे. या संस्थेला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल, त्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून उभा राहीन, असे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, उद्योजक दीपक गद्रे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते.

कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी आमदार डावखरे आणि ज्येष्ठ उद्योजक दीपक गद्रे यांचा सत्कार केला. याप्रसंगी त्या म्हणाल्या, ध्येयाने, चिकाटीने बाबुराव जोशी यांनी संस्था चालवली. पगार द्यायला सुद्धा पैसे नव्हते.

त्यावेळी प्रतिष्ठित मंडळींच्या घरी जाऊन बाबुरावांनी देणग्या आणल्या, प्रसंगी घर गहाण ठेवले, अशा वैभवशाली संस्थेत आपण काम करतोय. पुढील वर्ष हे जांभेकर विद्यालयाचे १०० वे वर्षे, कॉलेजला ७५ वर्षे, कनिष्ठ महाविद्यालयाचे अमृत वर्ष आहे. जानेवारीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येण्याचे मान्य केले आहे.

प्रास्ताविकामध्ये सतीश शेवडे यांनी संस्थेला गेल्या वर्षभरात पंधरा कोटी रुपयांच्या शैक्षणिक देणग्या मिळाल्या असल्याचे सांगितले. त्याकरिता शिल्पाताईंनी भरपूर मेहनत घेतल्याचे सांगितले. संस्थेच्या काही कामांकरिता आमदार डावखरे यांनी राजकीय ताकदती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. संस्थेसाठी देणग्या आणल्याबद्दल शिल्पाताई पटवर्धन यांचा विशेष सत्कार गद्रे व डावखरे यांच्या हस्ते केला. प्रा. महेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. साखळकर यांनी आभार मानले,

यांना मिळाला पुरस्कार
या वेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार बारटक्के इन्स्टिट्यूटमधील अमित सुभाष पालकर, मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार ग्रंथालयातील सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांना आणि मालतीबाई आदर्श सेवक पुरस्कार नामदेव सूवरे यांना देऊन गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 01/Oct/2024