चिपळूण : वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे नुकतेच कार्डियाक सर्जरी शिबीर संपन्न झाले. डॉ. राजीव गोडबोले (कार्डिओथोरेंसिक सर्जन) हे आपल्या चमू सह वालावलकर रुग्णालयात हृदयाच्या शस्त्रक्रिया शिबिरासाठी उपस्थित होते. हे शिबीर नुकतेच वालावलकर रुग्णालयात पार पडले.
या शिबिरांत डॉ. राजीव गोडबोले (कार्डिओथोरेंसिक सर्जन), डॉ. अभिक्षेक पोतनीस (कार्डिओथोरेंसिक सर्जन), डॉ. सचिन वैष्णव (कार्डियाक अनेस्थेटिक), सुरेश काळे (परफुजिनस्ट), ऑपरेशन थिएटर सिस्टर सुषमा गुरव, आय सी यू सिस्टर कविता कदम, समीक्षा कळंबे, विकास म्हसकर इत्यादी सहभागी झालेले होते.
या शस्त्रक्रिया शिबिरात ४ बायपास शस्त्रक्रिया, १ हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया व १ थोराकोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. प्रणव श्यामराज (वालावलकर रुग्णालयांचे हृदयरोग तज्ज्ञ) यांनी या सर्व रुग्णांच्या अॅनाजोग्राफी केल्या होत्या. त्यामध्ये या रुग्णांच्या हृदयाच्या तीनही रक्तवाहिन्या मध्ये गुढळ्या आढळुन आलेल्या होत्या. अशा रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टीचा उपयोग होत नाही. अशा रुग्णांच्यात बायपास शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. म्हणून ४ रुग्णांवर वालावलकर रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
एका रूग्णाला झडपेचा आजार होता. हृदयाची झडप व्यवस्थीत उघड झाप करत नव्हती. तिला सूज आली होती. त्यामुळे ह्या रुग्णांची झडप काढून कृत्रिम झडप बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सहाव्या रुग्णाच्या छाती वर झाड पडलेले होते. त्याच्या छातीला मार लागलेला होता. रूग्णाने १० ते १५ दिवस घरीच घरगुती उपचार केले. परंतु १५ दिवसानंतर त्याला छातीत दुखायला लागले, दम लागू लागला, ताप येऊ लागला, म्हणून रूग्णाला वालावलकर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.
वालावलकर रूग्णालयात एक्स रे, सोनग्राफी, सिटी स्कॅन केल्यानंतर असे लक्षात आले की, रुग्णाच्या छातीत पु झालेला आहे. तो पु फुफ्फुसाला व हृदयाला इजा करत होता. यामुळे फुफ्फुस आकुंचन झाले होते व पु हृदयापर्यंत पोचला होता. ह्या रुग्णाची थोराकोटॉमी शस्त्रक्रिया करून हृदय व फुफ्फुसाच्या बाजूला जमलेला सर्व पु काढण्यात आला.
वरील सर्व शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात महात्मा जोतिबा जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आल्या. सर्व रुग्ण व्यवस्थितीत बरे झाले व रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. सर्व रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. गोडबोले व त्यांच्या टीमचे व वालावलकर रुग्णालयाचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 17/Jan/2025














