चिपळूण : सावर्डे विद्यालयात स्व. गोविंदराव निकम यांना आदरांजली

चिपळूण : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्व. गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना ज्योत ज्ञानाचे दौलत राष्ट्राची या ब्रीद वाक्याने केली. शिक्षणाशिवाय सर्वसामान्य जनतेचा विकास नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाची सोय खेडयापाड्यात केली. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकास साधावा व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपावी हीच स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांना आदरांजली ठरेल असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक, सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी व माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम यांची 90 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या शुभहस्ते स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. स्व. निकम साहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे स्मृतीगंध भित्तीपत्रक गौरी शितोळे व गणेश बागवे यांनी तयार केले होते त्याचे अनावरण प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विद्यार्थी मनोगतात नेहा जाधव, कोमल पंडित व अमेय नांदिवडेकर यांनी दादांचे बालपण व जीवन याविषयी माहिती दिली. शिक्षक मनोगतामध्ये गौरी शितोळे यांनी त्यांचे शैक्षणिक राजकीय व सहकार क्षेत्रातील उत्तुंग कार्य आणि त्यामुळे समाज उद्धारासाठी झालेली मदत याबद्दल सोदाहरण माहिती दिली. या कार्यक्रमाला मान्यवरांसह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 17/Jan/2025