‘लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं’; रुग्णालयाकडून क्लीनचिट, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मद्यप्राशन करुन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मी मद्यप्राशन केलं की नाही पोलीस बघून घेतील.

मात्र मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. यानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल-

ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचिट मिळाली. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता लक्ष्मण हाके हे नागपुरला एका कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे, या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याचे दिसत आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचं दिसतंय. यानंतर लक्ष्मण हाके तात्काळ पोलिसांसोबत ससून रुग्णालयात पोहचले. लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे. तर मराठा आंदोलकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

संभाजीराजे, तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते- हाके

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण सुरू असताना त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली होती. त्यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “संभाजीराजे, तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही.” संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच पुण्यातील ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 01-10-2024