दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालय नजीक दोन परप्रांतीय फळ विक्रेत्यांनी अन्य एक फळ विक्रेत्याला फिल्मी स्टाईल मारहाण करत दुचाकीवरून धूम ठोकली. या मारहाणीत एकजण बेशुद्ध पडला. ही घटना दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली.
या घटनेवेळी जमलेल्या बघ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. या वेळी बेशुद्ध पडलेल्या फळ विक्रेत्याला नजीकच्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत मारहाण करणारे दोघे देखील याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या बाबत दापोली पोलीस स्थानकात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नाही. मात्र, नंतर घडलेला विषय परस्पर दोघे मिटवत आहेत, असे ठाणे अमलदार यांनी सांगितले. ही मारहाण नेमकी कशामुळे झाली, याबाबत पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही.
दापोली शहरात परप्रांतीय फळ विक्रेते, भंगार व्यावसायिक, बांधकाम व्यवसायिक, आणि अन्य व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपापसातील वादविवाद असे भर रस्त्यात हाणामारीत दिसत आहेत. त्यामुळे याला कुठेतरी कायद्याचे दृष्टीने आळा बसणेही महत्वाचे आहे, असे शहरातील सूज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.
परप्रांतीयांची पोलिसांकडे नोंद नाही
दापोलीत भंगार व्यवसाय विक्रीचे मोठे जाळे आहे. यातून रोज लाखोंची उलाढाल दापोलीत होते. हे सगळे भंगार व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. मात्र, या व्यावसायिकांची नोंद दापोली पोलीस स्थानकात मिळत नाही. दापोलीत अनेक वेळा गाड्या चोरीला जाणे, लोखंडी साहित्य चोरीला जाणे अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे त्यांची सुई अप्रत्यक्ष या भंगार व्यावसायाकडे जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 18/Jan/2025














