लांजा : तालुक्यातील लांजा-साटवली सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपांचे प्रमाण वाढले होते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन या मार्गावर झाडी-झुडपे तोडण्यास सुरुवात झाली आहे.
लांजा तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा मुख्य मार्ग म्हणून लांजा साटवली मार्गाकडे पाहिले जाते. सध्या या रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आली असली तरी रस्ता झाडी-झुडपांच्या गर्तेत अडकला आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची साईडपट्टी गायब झाली आहे. अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना वाहन चालकांची तारांबळ उडते.
वाढलेल्या झाडी झुडपामुळे साईडपट्टीच दिसत नसल्याने झुडपांमध्ये वाहने जात असून, यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर काही दिवसांपूर्वी दुचाकी व बसमध्ये अपघात होऊन दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली होती. लांजा-साटवली मार्गावरील खावडी गावच्या पुढे साटवली गावापर्यंत ही झाडी-झुडपे वाढली आहेत. या मार्गावरून दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. हा मार्ग राजापूर व रत्नागिरीला जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरील झाडी-झुडपे लवकरात लवकर तोडून मार्ग मोकळा करावा असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यांची दखल घेत लांजा साटवली मार्गावरील झाडी तोडण्यास सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 01/Oct/2024














