मुंबई- गोवा महामार्गावर टोलनाक्याच्या कामाला प्राधान्य

रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहीलेल्या समृद्धी महामार्गाच काम सहा वर्षात पूर्ण झाले, मात्र मुंबई- गोवा महामार्गाचे काम १६ वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ कि.मी. चा असून, तो सहा वर्षात पूर्ण झाला तर मुंबई-गोवा महामार्ग ४७१ कि.मी.चा असूनही सोळा वर्ष उलटली तरी पूर्ण झालेला नाही. समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो, मात्र मुंबई-गोवा महामार्गाला १६ वर्ष का लागतात, हा कोकणवासीयांचा प्रश्न आजही प्रश्नच राहिला आहे. सध्या तर महामार्गाचं काम बाजूलाच राहिलं असून पहिलं टोलनाक्याचं कामच प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

गोवा महामार्गाच्या आरवली ते लांजा हा जवळपास ६० कि.मी.च्या महामार्गाचे काम रखडले आहे. सध्या संथगतीने काम सुरू आहे. कोकण विकासाच्या समृद्धीचे रडगाणे सोळा वर्षानंतरही गातच राहावे…! असे म्हणण्याची पाळी कोकणवासीयांवर आली असून अपेक्षा आणि स्वप्नांचा भंग झाला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला दिरंगाई केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांना काढून नव्याने तिसऱ्या ठेकेदाराला काम दिले तरीही हे काम अपूर्णच आहे. संथगतीने चालणाऱ्या या कामामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत. जनतेच्या रेटयानंतर शासनाने संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार, विविध संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे, उपोषणे, धरणे अशी अनेक आंदोलने केली आहेत. तरीही हा महामार्ग आजही अपूर्णच आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था महामार्गाची आहे. कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्र मागेच पडला असून कोकणवासियांना कित्येक वर्षांपासून न्याय मिळाला नाही. कोकणवासियांचा अंत सरकार आणखी किती दिवस पाहणार? असा सवालही प्रवाशांतून विचारला जात आहे. सध्या निवळी येथील कोकजेवठार येथे टोलनाक्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. मात्र त्याच्याच शेजारी असलेले खड्डे सध्या जीवघेणे ठरत आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग : १६ वर्षाची रखडपट्टी…
कोकणविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मुंबई-गोवा महामार्ग आजही रखडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाच्या विलंबामुळे कोकणवासीयांसह या मागनि प्रवास करणाऱ्या हजारो लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. आश्वासनांची खैरात, निधी मंजुरीचे दिखावे आणि सरकारी अनास्था यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे, आणि त्याचा फटका रोजच्या प्रवाशांपासून स्थानिक जनतेपर्यंत साऱ्यांनाच बसत आहे.

राजकीय आश्वासनांची खैरात आणि प्रशासनाची उदासीनता…
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली, परंतु निवडणूक संपताच ती हवेत विरुन गेली. १६ वर्षांच्या या काळात महामार्गाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये मंजूर झाल्याचे कागदोपत्री दिसते, परंतु प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी अर्धवट रस्ते, पुलांची तसेच उड्डाणपूलाची अपूर्ण कामे आणि रखडलेले बायपासचे कामे आजही पडून आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्याकडून अपेक्षित पाठपुरावाच होत नसल्याने महामार्गाच्या कामाला योग्य गती मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि राज्यकर्त्यांविषयी मोठा असंतोष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 18/Jan/2025