चिपळूण : कोकणातील रस्ते, आरोग्य, उद्योग व शैक्षणिक व्यवस्था अडचणीत असून, त्याला सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. या धोरणांमध्ये बदल घडवण्यासाठी कोकणी जनतेचे पक्षविरहित आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. येत्या वीस दिवसांत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, चिपळूणची पूररेषा व गाळ उपशासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिला.
चिपळुणात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई म्हणाले, ‘संपूर्ण देशभरात मुंबई-गोवा महामार्गासारखा दुरवस्था झालेला रस्ता नाही. १३ वर्षे रखडलेला रस्ता अनेक ठिकाणी अपूर्ण व काही ठिकाणी घाईघाईने केला जात आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने कमिटी नेमावी. त्यांनी माझ्यासोबत चिपळूण ते मुंबई प्रवास करावा म्हणजे या कामात वरपासून खालपर्यंत कसा भ्रष्टाचार झाला आहे, हेही लक्षात येईल. गुहागर-विजापूर रस्त्याचीही बिकट परिस्थिती आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ व पूरमुक्तीसाठी ज्या पद्धतीने धोरण ठरवायला हवे तेही मार्गी लावले जात नाही. अवघ्या मुंबईत पूर भरतो; पण कुठेही पूररेषा नाही; परंतु चिपळुणात अनेक वर्षे पूररेषेचे घोंगडे भिजत ठेवले आहे. जगबुडी नदीचा प्रवाह पर्यायी मार्गाने समुद्राच्या दिशेने वळवण्याबाबत सुचवले होते, तेही केलेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 18/Jan/2025














