खेड : शहरातील लहान मुलांसह आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला लवकरच नवा साज दिला जाणार आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी १२ लाख ५५ हजार २६० रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या सुशोभीकरणाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले होते. उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडल्याने दुरुस्तीअभावी उद्यानाची दैनावस्था झाली होती. साडेचार वर्षांपूर्वी उद्यानाच्या सुशोभीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करूनही उद्यान भकास झाले होते. उद्यानात केवळ बसण्यासाठी असलेली आसने वगळता अन्य साहित्याचा थांगपत्ताच नव्हता. ठाकरे उद्यानाला नवा साज देण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेतला.
शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन सातपुते व पदाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी निधीची उपलब्धता करून देण्यासाठी आमदार कदम यांच्याकडे आग्रह धरला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात आमदार कदम यांनी पाठपुरावा केला.
या सुशोभीकरण भूमिपूजनप्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख स्वप्नील सैतवडेकर, महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला, युवासेना शहराधिकारी सिद्धी खेडेकर, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिनार चिखले, भूषण चिखले, उद्योजक शैलेश कदम, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग माने, ओंकार तोडकरी, कुंतल चिखले, प्रसाद शिगवण, दीपक नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सेल्फी पॉईंट उभारणार
उद्यानात अद्ययावत व मोठ्या स्वरूपातील ‘माझं खेड सेल्फी पॉईंट’ची उभारणी करण्यात येणार आहे. उद्यानात बागडण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसह आबालवृद्धांना ‘सेल्फी’ घेण्याचा मोह आवरता येणार नाही तसेच खेड-भरणे मार्गालगतच्या उद्यानाबाहेरच्या परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 01/Oct/2024














