खेड : स्वामी नारायण मंदिर भूमिपूजन कार्यक्रमातून खेडमध्ये हिंदुत्वाचा जागर होत आहे, असे प्रतिपादन ना. योगेश कदम यांनी येथे केले. रविवारी स्वामी नारायण संस्कार धाम मंदिराचे भूमिपूजन संत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत करण्यात आले. खेड येथील बीएपीएस स्वामीनारायण संस्कारधाम खेड यांच्या वतीने खेडमध्ये रविवार दि. 19 रोजी स्वामीनारायण संस्कार धाम मंदिराचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या समारंभाचे संचालन अक्षरचरीत स्वामी यांनी केले. भरणे गावाच्या हद्दीत पाटीदार भवन जवळच्या नियोजित मंदिराचे भूमिपूजन पूर्व कार्यक्रम दि.16 ते 18 या कालावधीत दररोज सायंकाळी 7.30 ते 8.45 संत योगी प्रेमी स्वामी यांचे भज गोविंदम् या विषयावर संगीतमय हरी कथा झाली. दि.19 रोजी सकाळी 9.30 वाजता कोठारी स्वामी यांच्या हस्ते, गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम व अनेक संतांच्या उपस्थितीत शिला पूजन व महापूजा झाली. यावेळी स्वामी नारायण भक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमात ना.योगेश कदम म्हणाले, कोकणातील पहिले भव्य स्वामी नारायण संस्कार धाम मंदिर खेडमध्ये उभे रहात आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे मंदिर खेडमध्ये होत असल्याने आता आपल्या सर्व खेडवसियांची जबाबदारी वाढली असून आगामी काळात मंदिराची भव्यता जपण्याची शपथ आपण घेऊया. संत आणि सनातन संस्कृतीच्या माध्यमातून भावी पिढीला संस्कार देण्याचे काम येथे होणार असल्याने त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही करू, असे ना.कदम म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 20-01-2025














