खेड : कला संचालनालय कला प्रदर्शनाचे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने दरवर्षी आयोजन केले जाते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक विभागात महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. यावर्षी घेण्यात येत असलेल्या ६४ व्या राज्य कला प्रदर्शनासाठी येथील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कला शिक्षक राकेश देवरुखकर यांच्या चित्राला राज्य शासनाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
राज्यातील १५ कलाकारांच्या कलाकृतींना राज्य पुरस्कार स्वरूपात पारितोषिक दिले जाते. देवरुखकर यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी २०१७ व २०२२ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. देवरुखकर यांचे तैल रंगावर प्रभुत्व आहे. जलरंगाच्या विविध छटा त्यांना अवगत असून चित्रकलेचे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध संस्थासह विविध क्षेत्रांत आपल्या कलेचा ठसा उमटवतात. यावर्षी त्यांनी निसर्गचित्र काढले आहे.

कलाकाराच्या नजरेतून रसिकांना न्याहाळता येणारे सौंदर्य है अंतर्मुख करायला लावणारे असते. देवरुखकर यांच्या चित्रांचे विषय रसिकांना सहज आकलन होतील, असे असतात.. देवरुखकर यांच्या कलाकृतीला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, संस्थेचे सचिव मंगेशभाई बुटाला, चेअरमन राजूभाई बुटाला, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव, सहजीवन संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी येथे ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. त्यावेळी पुरस्कार वितरणही होईल.
दुर्मिळ भू-मातेचे चित्र रेखाटले
२००६ पासून राज्य शासनाच्या आयोजित स्पर्धेमध्ये देवरुखकर सहभागी होत होते. त्यांनी यापूर्वी अनेक चित्रे रेखाटून राज्यस्तरावर मान पटकावला आहे. नुकतेच त्यांनी दुर्मिळ असे भू-मातेचे चित्र रेखाटले होते. त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतूक केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:41 PM 20/Jan/2025














