Ratnagiri : जिल्ह्यात सार्वजनिक पाणीस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण

रत्नागिरी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत २ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतीमधील ७ हजार ७९० सार्वजनिक स्रोत आहेत.

पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोनवेळा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. सार्वजनिक स्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्यसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षण असून, त्याच्या निकषांनुसार तसेच स्रोतांच्या जोखीमेनुसार वर्गीकरण करून व ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरित केले जाणार आहे.

ग्रामपंचायतींमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात येते तसेच ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड दिले जाते.

ग्रामपंचायतीमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड देतात. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचे नाव टाकून पिवळे कार्ड देण्यात येते. सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या व पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देण्यात येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 01/Oct/2024