राजापूर : धोपेश्वर पन्हळेतील ‘त्या’ धार्मिक स्थळाविरोधात ग्रामस्थांचे २६ जानेवारीपासून उपोषण

राजापूर : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी भूमिकाच कारणीभूत असल्याची माहिती आता पुढे आली आहे. यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून प्रजासत्ताक दिनापासून या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

केवळ धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या संस्थेच्या नोंदणी व्यतिरिक्त मदरसा चालविण्याबाबत व अन्य बाबींबाबत अन्य कोणतीही परवानगी संबंधित मदरसा चालकांकडे नसल्याची बाब उघड झाली आहे. असे असतानाही गेली दीड ते दोन वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी हा अनधिकृत मदरसा बंद करण्याची वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत, अशा प्रकारे या ठिकाणी अनधिकृत मदरसा चालविण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

धर्मादाय आयुक्तांकडील या संस्थेची नोंदणी प्रस्ताबात पत्ता राजापूर शहरातील आणि मदरसा सुरू धोपेश्वर पन्हळे परिसरात हा काय प्रकार असा सवाल उपस्थित केला जात असून या मदरशात परराज्यातील मुले असून त्यांची संख्या ६० इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. अशाप्रकारे राजापुरात येऊन परराज्यातील मुलांनी या मदरशामध्ये शिक्षण घेण्याचा हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

मौजे पन्हळे तर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत तसेच धार्मिक तेढ वाढवणारा विषय असून हा मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे. यापूर्वीच्या प्रशासनाच्या आदेशांना न जुमानता हा अनधिकृत मदरसा अद्याप सुरुच असल्याने २६ जानेवारी २०२५ पासून हा अनधिकृत मदरसा बंद होईपर्यंत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा पन्हळे तर्फ राजापूरच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

याबाबतचे एक निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांसह राजापूर तहसिलदाराना सादर केले आहे. या प्रकरणात प्रशासनाचे बोटचेपे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अन्य कोणतीही परवानगी नाही
तहसीलदार विकास गंबरे या मदरशा संचालकांकडे संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त अन्य कोणताही परवाना वा दस्तऐवज नसल्याची माहिती खुद्द राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे. या मदरशातील विद्यार्थी संख्या, त्यांचे वास्तव्य तपासण्याबाबत पोलिस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचेही गंबरे यांनी सांगितले. सदरची जागा ही संस्थेच्या नावे खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला असल्याचेही गंबरे यांनी सांगितले. तर या मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतचा अहवालही सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 21/Jan/2025