रत्नागिरी : गोवा शिपयार्ड कंपनीने आपल्या भागधारकांना १४० टक्के लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे रत्नागिरीतील संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.
गोवा शिपयार्ड कंपनीची ५८ वी वार्षिक सभा कंपनीच्या गोव्यातील कार्यालयात अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेशकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बहुसंख्य सभासद यावेळी उपस्थित होते. सन २०२३-२४ चा अहवाल सभेने मंजूर केला. त्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल २०९० कोटी रुपये होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीची महसुलातील वाढ १०० टक्के आहे. कंपनीचा करपूर्व नफा ३६४.६३ कोटी रुपये, तर करानंतरचा नफा २७१.३२ कोटी रुपये होता. कंपनीच्या नफ्यात लक्षणीय ७६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे व्हॅल्यू ऑफ प्रॉडक्शन १४८७.४२ कोटी झाले आहे. गतवर्षी हे मूल्य ५०९.३४ कोटी होते. उत्पादनाच्या मूल्यातील ही वाढ कंपनीच्या प्रॉडक्शन ॲक्टिव्हिटीमधील गतिमानता दर्शवते.
कंपनीने गेल्या आर्थिक वर्षासाठी १४० टक्के लाभांश आपल्या सभासदांना दिला आहे. वार्षिक सभेने लाभांशाला मंजुरी दिली. एकूण लाभांश ८१.४८ कोटी रुपयांचा आहे. सभेत वार्षिक अहवालाला मंजुरी देण्यात आली. ऑडिट रिपोर्ट स्वीकारण्यात आला. लाभांशाला मंजुरी देण्यात आली.
गोवा शिपयार्ड कंपनीत सध्या लहान-मोठ्या २२ शिपची निर्मिती होत आहे. कंपनीने उत्तम पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. सुरू असलेली २२ शिपची निर्मिती हे त्याचेच द्योतक आहे. कंपनीमध्ये १८५६२ कोटी रुपये खर्च करून या २२ शिपची निर्मिती होत आहे. त्यात दोन फ्रिगेट शिप रशियाच्या सहकार्यातून निर्माण होत असून त्यापैकी एकाचे जलावरण नुकतेच पार पडले.
गोवा शिपयार्डची ऑर्डर बुक पोझिशन २० हजार कोटीपलीकडे गेली आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकासावर गोवा शिपयार्ड प्रभावीपणे काम करत आहे.
सभेला स्वतंत्र संचालक तथा ऑडिट समिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन दुसरे स्वतंत्र संचालक हुकूमचंद हिंदोजा, संचालक कॅ. जगमोहन तसेच दुसरे संचालक सुनील बागी, कंपनी सेक्रेटरी छाया जैन उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 01-10-2024














