सावर्डे : विद्यार्थ्यांनी केली केदारनाथ मंदिर परिसराची स्वच्छता

सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक, उच्व माध्यमिक विद्यालयाने गांधीतीर्थ जळगाव या अभियानांतर्गत सावर्डेतील ग्रामदैवत केदारनाथ मंदिर परिसराची स्वच्छता केली.

स्वच्छ शाळा सुंदर शाळा याबरोबरच सुंदर गाव स्वच्छ परिसर यासाठी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व पटवणे हा अभियानाचा हेतू आहे. विद्यालयाने घराघरांत स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी गांधीतीर्थ जळगाव या अभियानांतर्गत वर्षभरात विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये सर्वांना सहभागी करून घेऊन कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक स्वच्छतेची जाणीवजागृती करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सावर्डे गावचे ग्रामदैवत केदारनाथ मंदिर परिसरात स्वच्छता करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून कचऱ्याचे विलगीकरण करून त्याचे व्यवस्थापन करण्याबाबत जाणीव निर्माण करण्याचे काम केले आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 21/Jan/2025