संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकापुढे प्रजासत्ताकदिनी उपोषण

संगमेश्वर : गतवर्षी आमदार शेखर निकम आणि निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीसाठी मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, ही मागणी कोकण रेल्वेकडून विचारात घेतली गेली नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निसर्गरम्य चिपळूण, संगमेश्वर ग्रुपतर्फे प्रजासत्ताकदिनी उपोषण करणार आहे.

संगमेश्वर रेल्वेस्थानकातून कोकण रेल्वेला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते. कोकण रेल्वेमार्गावर ताशी १३० च्यागतीने धावणाऱ्या एक्स्प्रेस नजरेस पडतात. रेल्वेप्रवाशांची कोकण रेल्वेने एकप्रकारे मुस्कटदाबीच केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या हिताचे विचार जपणारे खूप कमी लोक आज नजरेस येतात. कोकणातील जनतेला रेल्वे प्रवास सहजसोपा झाला. तो प्रवास नक्कीच सुखकर झालेला नाही. कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे निसर्गरम्य चिपळूण, संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले. या आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 22/Jan/2025