रत्नागिरी : दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी होण्याच्या घटना इतर जिल्ह्यांच्या तुलनेने फारच कमी झाल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात २४ दुचाकींची आणि अन्य ४ वाहनांची अशी एकूण २८ वाहनांची चोरी झाल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दरदिवशी दोन, तीन दुचाकी चोरीस जात होत्या. चोरटे एवढे माहीर होते की, विनाचावी दुचाकीचे कनेक्शन थेट करून ते गाडी चोरायचे किंवा हॅण्डल लॉक असले तरी ते तोडून चोरी करायचे. काही दुचाकी चोरल्यानंतर काही मिनिटात त्याचे सुट्टे भाग करून अदलाबदल केली जात होती. त्यामुळे अनेकवेळा चोरट्यांनी या पद्धतीने पोलिसांना गुंगारा दिला होता; परंतु रत्नागिरी पोलिस आणि कोल्हापुरातील पोलिसांनी या गॅंग पकडल्या आणि त्यानंतर दुचाकी किंवा इतर वाहने चोरण्याचे प्रमाण कमी झाले; परंतु ते बंद झालेले नाही.
पोलिस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात शहराच्या ठिकाणीच दुचाकी चोरी होत असल्याचे दिसते. रत्नागिरी शहराचा विचार करता रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथील रेल्वेस्थानकावर तसेच शहरातील मारूती मंदिर भागात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. बरेचदा दुचाकी लावल्यानंतर त्याचे हँडल लॉक न करता चालक निघून जातात. त्यामुळे चोरट्यांना त्या पळवून नेणे सोपे होते. काही चोरटे थेट कनेक्शन करून किंवा हॅण्डल लॉक तोडून ही चोरी करतात. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २४ दुचाकींची विविध भागातून चोरी झाली आहे तसेच चोरट्यांनी अन्य ४ वाहनेही चोरून नेली आहेत. अशी आठ महिन्यांत एकूण २८ वाहनांची चोरी झाली आहे.
१२ वाहनांचा लागला शोध
चोरीला गेलेल्या २४ दुचाकी आणि ४ अन्य वाहने अशा एकूण २८ पैकी १२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोऱ्या उघड झाल्या असून, न्यायालयाच्या परवानगीने ही वाहने संबंधितांना देण्यात आली आहेत.
जिल्ह्यात चोरीला गेल्या वाहनांचा तपशील
महिना दुचाकी* इतर वाहनांने* सापडलेली वाहने
जानेवारी* २* ०* १
फेब्रुवारी* ४* ०* २
मार्च* १* ०* ०
एप्रिल* ३* ०* १
मे* ४* १* ३
जून* ३* २* ३
जुलै* ५* १* २
ऑगस्ट* २* ०* ०
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 01-10-2024














