October Heat : राज्यात तापमानात होतेय वाढ..

पुणे : मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असून, राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला होता, तो आता ओसरू लागला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत, तर हवामान विभागाने राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज दिला.

गेल्या आठवड्यात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती. त्यानंतर सलग सहाव्या दिवशीही मान्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला होता. आजही मान्सूनचा प्रवास थबकलेला आहे.

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. तर धाराशिव, लातूर, बीड, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला.

सोमवारी पावसाची उघडीप !

राज्यामध्ये सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. सांगली जिल्हा (०.१ मिमी) सोडला तर कुठेही पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे आता कमाल तापमानात वाढ होताना दिसून येत आहे.

ऑक्टोबर हीट जाणवू लागली !

राज्यामध्ये पाऊस ओसरला असून, आता कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवू लागला आहे. राज्यात नागपूरमध्ये सोमवारी ३५.४ कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान महाबळेश्वरला १६.६ मिमी नोंदवले गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 01-10-2024