रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : जिल्हा परिषद भवन परिसरात मंगळवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. सर्वांच्याच हातात झाडू पहायला मिळाली. यामुळे कार्यालय व परिसर चकाचक झाला आहे.

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा या विषयावर दि. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या १०० दिवसात प्राधान्याने कार्यवाही करावयाची आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालय व परिसरामध्ये मंगळवारी अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम पार पडली.

या स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोहीम यशस्वी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 22/Jan/2025