चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद भुरण व कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे अलोरे- शिरगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री कारवाई केली आहे. या ट्रकमधून २२ गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. ही गुरे लोटे येथील गोशाळेत सुरक्षितस्थळी हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या विषयात भाजप नेते माजी खासदार विद्यमान आमदार निलेश राणे यांनी लक्ष घातले असून शनिवार दिनांक २५ रोजी संध्याकाळी चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ ‘गर्जना सभा’ आयोजित करण्यात आली आहे, असे श्री. राणे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
चिपळूणमधून गोवंशची वाहतूक होत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तर गेल्या काही वर्षांत गोवंश वाहतुकीप्रकरणी अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री खेर्डी येथून गोवंशची वाहतूक होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांना समजली. यामुळे या सर्वांनी गोवंशच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले होते. ज्या ट्रकमधून गुरांची वाहतूक होत होती. त्या ट्रकचा पाठलाग केला. तसेच याबाबतची माहिती अलोरे- शिरगाव पोलिसांना देत या ट्रकवर कारवाई करण्याची मागणी केली.
यानंतर अलोरे – शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी कुंभार्ली घाटमाथ्यावरील पोलिसांना तशा सूचना केल्या. दरम्यान, गुरांची वाहतूक करणारा ट्रक कुंभार्ली घाटात आला असता तेथे असलेल्या पोलिसांनी या ट्रकला थांबवले. तोपर्यंत भाजपचे पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्ते तेथे पोहोचले होते. या सर्वांच्या समोर या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये कोंबलेली गुरे आढळून आली. दोन-चार नव्हे तर तब्बल २२ गुरे (बैल) आढळून आली. यामध्ये तीन गुरे जखमी अवस्थेत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी ट्रक अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. तर गुरांच्या बेकायदा वाहतुकीप्रकरणी दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल खेरटकर (रा. खेडीं) तर ट्रक चालक श्री. नलवडे (रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चिपळूणमध्ये २५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा निलेश राणे
कुंभार्ली घाटात गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर भाजप पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली असल्याची माहिती भाजप नेते आमदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर श्री. राणे यांनी या विषयात लक्ष घातले आहे. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कुंभार्ली घाटात उघडकीस आलेल्या गुरांच्या वाहतुकी प्रकरणी सबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून केलेली आहे. तर शनिवार दिनांक २५ रोजी संध्याकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ सभा आयोजित करण्यात आली असून चिपळूणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या सभेत गोवंश तस्करीचा पर्दाफाश करणार आहोत, असा इशारा दिला आहे. तर येत्या अधिवेशनात गोवंश तस्करीप्रकरणी कडक कायदा करण्यात यावा. तसेच या तस्करी प्रकरणात जे जे सहभागी आहेत. त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:48 AM 23/Jan/2025














