खेड : जगबुडी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मार्चअखेरपर्यंत होणार जमीनदोस्त

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारी गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. धोकादायक पुलामुळे पादचाऱ्यांकडूनही वापर बंद झाला आहे. त्यामुळे जगबुडी पूल पाडण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मार्चअखेरपर्यंत जुना पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

भरणेतील ब्रिटिशकालीन पूल महत्वाचा दुवा ठरला होता. या पुलावर अनेक प्राणांतिक अपघातही घडले आहेत. १९ मार्च २०१३ मध्ये महाकाली आरामबसला झालेल्या भीषण अपघातात ३७ जणांना प्राणास मुकावे लागले होते. या भीषण अपघातानंतर जुन्या जगबुडी पुलाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षी अतिवृष्टीदरम्यान पुलावरून पाणी वाहू लागताच महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होत होता. त्यामुळे या पुलाशेजारी अन्य पूल उभारणी करण्यात आली. नव्या जगबुडी पुलाचे बांधकाम पूर्ण होताच गेल्या ३ वर्षापासून जुन्या पुलाचा वापर पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे अखेरची घटका मोजणारा जुना जगबुडी पूल धोकादायक स्थितीत उभा आहे. यापूर्वी जुन्या जगबुडी पुलावरून पादचाऱ्यांची वर्दळ सुरू होती, मात्र नव्या पुलाच्या उभारणीनंतर पादचाऱ्याच्या रहदारीचा मार्गही बंद झाला आहे. कोकण आयुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करत जुना जगबुडी पूल पाडण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 23/Jan/2025