दावोसमध्ये दुसऱ्या दिवशी 15.95 लाख रोजगारनिर्मितीचे 15.70 लाख कोटींचे सामंजस्य करार

मुंबई : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये नवा इतिहास घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.

यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल असे म्हटले जात आहे. बुधवारी रिलायन्स समुहाचा सर्वात मोठा गुंतवणूकीचा करार झाला आहे. तर पाहूयात महाराष्ट्राचे कोणते करार या परिषदेत झाले.

दुसऱ्या दिवशीच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक अ‍ॅमेझॉन कंपनी करणार आहे.या कंपनीने 71,795 कोटी रुपये इतकी गुंतवणूक केलेली आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार आज केले आहेत. एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची गुरुवारी भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान उभयनेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी आपण लवकरच भारतात येणार असल्याचे म्हटले आहे. ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची देखील देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 23-01-2025