चिपळूण : अलोरे शिरगाव भागातील वाशिष्ठी नदीत बेसुमार वाळू उपसा

चिपळूण : तालुक्यातील अलोरे शिरगाव विभागातील वाशिष्ठी नदीत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना येथे राजरोसपणे वाळू उत्खनन केले जात आहे. या प्रकरणी महसूल विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदन शिरगाव येथील ग्रामस्थ सूरज शिंदे यांनी शिरगाव मंडळ अधिकारी, तहसीलदारांना दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिरगाव परिसरातील वाशिष्ठी नदीत बेकायदा वाळू उत्खनन केले जात आहे. सध्याच्या स्थितीला तालुक्यात कुठेही वाळू उत्खननाला महसूल विभागाने मान्यता दिलेली नाही. तरीही येथे वाळू उत्खनन केले जात आहे. विविध ठिकाणी शासकीय बांधकामे सुरू आहेत तसेच खासगी जागेत बांधकामे होत आहेत. त्या ठिकाणी वाळूचे ढीग दिसून येतात. तालुक्यात जर वाळू उपशाला बंदी असेल तर या बांधकामाच्या ठिकाणी वाळू येथे कुठून, असा सवाल ही शिंदे यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. पूर्व विभागातील वाशिष्ठी नदीत सातत्याने बेकायदा वाळू उत्खनन केले जाते. त्यामुळे या उत्खननाला महसूल विभागाने आळा घालावा. वाळू वितरण बंद असताना ही अनेक ठिकाणी रॉयल्टी पावती नसलेली वाळू, रेती, गोटा दगड वाहनांमधून शासकीय कामाच्या ठिकाणी पोचवली जाते. त्यांचे ढीग व डेपो केलेले आढळतात. वाहतूकदार व कंत्राटदार यांच्यावर नियंत्रण राहिलेले नाही. जिथे बेकायदा ढिगारा आढळतो तेथे तलाठ्यांमार्फत पंचनामा करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 23/Jan/2025