Ratnagiri : पंधरा वर्षे झालेल्या ७० एसटी बस भंगारात; १० नव्या बस मिळणार

रत्नागिरी : महिला व वृद्धांसाठीच्या शासनाच्या विशेष योजनांमुळे एसटीचे भारमान दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ नवीन तंत्रज्ञान असलेल्या बसेस उपलब्ध करून देत आहे; परंतु दुसरीकडे आयुर्मान संपलेल्या बसचे निर्लेखन (भंगारात) काढल्या जात आहेत. यावर्षी आयुर्मान संपलेल्या ७० बस महामंडळाने भंगारात काढल्या आहेत. या बदल्यात एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन १० गाड्या येणार आहेत. गेल्या ५ वर्षांत रत्नागिरी विभागातून एकूण २२९ गाड्या भंगारात दिल्या आहेत.

सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. आत्ता शासनाच्या विविध योजनांमुळे एसटीला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी एसटीचे प्रयत्न आहेत. त्यामुळे दर्जेदार गाड्या ताफ्यात येण्यासाठी आयुर्मान संपलेल्या गाड्या दरवर्षी भंगारात काढल्या जातात.

एसटी बसचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित केले आहे. १५ वर्षांनंतर बस वापरातून बाजूला काढल्या जातात. तत्पूर्वी गाड्यांचे सुस्थितीत असलेले स्पेअरपार्ट काढून ठेवले जातात. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून दरवर्षी बसेसचे निर्लेखन करण्यात येते; मात्र २०२२-२३ मध्ये एकही बस निर्लेखित करण्यात आलेली नाही. आयुर्मान संपलेल्या बस वापरातून बाजूला काढल्या जात असतानाच नवीन बसची मागणी करण्यात येते. त्यामुळे, बसची संख्या कमी होत असतानाच ताफ्यात नवीन बसची भर पडते. रत्नागिरी विभागात येत्या काही दिवसांत नवीन दहा गाड्या उपलब्ध होणार आहेत.

गाड्या भंगारात काढल्यानंतर त्याचे चांगले पार्ट काढून घेतले जातात. उर्वरित बसचा लिलाव केला जातो. येत्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच फेब्रुवारी/ मार्चमध्ये आणखी १४ गाड्यांचे निर्लेखन केले जाणार आहे.

■ पाच वर्षांतील निर्लेखित गाड्या

वर्ष गाड्यांची संख्या

-२०२०-२१ ४६
-२०२१-२२ १८
-२०२२-२३ ००
-२०२३-२४ ९५
-२०२४-२५ ७०

■ एसटीच्या गाड्या

-शिवशाही ३४
-स्लीपर २४
-शहरी गाड्या २४
-भाडेतत्त्वावरील ४०
-साध्या गाड्या ५१०
-एकूण गाड्या ६३२

“अपघात कमी करण्याठी सुरक्षित वाहतूक अभियान राबवत असतानाच सुस्थितीतील बसही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे १५ वर्षे वापरानंतर बस बाजूला काढल्या आतात. बसची संख्या कमी झाल्यास दैनंदिन प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी ताफ्यात नवीन बसही उपलब्ध करून देण्यात येतात”. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 23-01-2025