संस्कृत अभ्यासातून अनेकविध संधी : डॉ. सचिन कठाळे

रत्नागिरी : व्याकरण व वैज्ञानिकदृष्ट्या जगात फक्त संस्कृत ही उच्चारणासाठी परिपूर्ण भाषा आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये पाठ्यपुस्तकातील संस्कृत शिकवले जाते; परंतु संस्कृत कसे बोलावे, हे शिकवणे आवश्यक आहे. भारतातील काही ठिकाणी दैनंदिन व्यवहारात संस्कृत भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे संस्कृत हा विषय फक्त परीक्षेत गुण मिळवून देणारा नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्वल करणारा आहे. यात अनेकविध संधी आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित कालिदास स्मृती व्याख्यानमालेच्या पहिले पुष्प त्यांनी गुंफले. डॉ. के यांनी संस्कृत कुठे शिकवले संस्कृतशी निगडित अभ्यासविषय जाणि अपेक्षा यासंबंधी विस्तृत विवेचन केले, ते म्हणाले की, शाळा, महाविद्यालये विश्वविद्यालये, गुरुकुल, पारंपरिक पाठशाळा, मठ, आश्रम आणि घरीसुद्धा संस्कृत शिकवले जाते.

संशोधन, चित्रपटसृष्टी, अभिलेखागार, व्यवस्थापन, अनुवाद, शब्दकोश निर्मिती, कथालेखन, पौरोहित्य याच्याशी संस्कृतचा जवळचा संबंध आहे तसेच आयुर्वेद, योग, संगीत, नृत्य, नाट्य, ज्योतिष, शिल्पशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, गर्भसंस्कार, उच्चारणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, ६४ कला, विमानशास्त्र, जाहिरात, विपणन, प्रसिद्धीफलक, स्पर्धा परीक्षक हे सुद्धा संस्कृतवर अवलंबून आहेत.

त्यांनी सांगितले की, संस्कृत जाणल्याशिवाय त्यात अनुवाद करता येणार आहे. संस्कृत भारतीतर्फे सरल संस्कृत प्रशिक्षण दिले जाते. त्यातून भारतात अनेक ठिकाणी संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मी संस्कृत शिकलो तरच त्यात योगदान देऊ शकतो. त्यामुळे ते शिकले पाहिजे. विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान, अन्य भाषांचे ज्ञान मिळवले पाहिजे. त्यासाठी संस्कृतचे ज्ञानही आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक संस्कृत शिकावे, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हावे.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. कठाळे यांचा सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी वक्ते डॉ. कठाळे यांचा परिचय करून दिला. प्रा. प्रज्ञा भट यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानासाठी विद्यार्थी व रत्नागिरीकर श्रोत्यांची गर्दी झाली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 23/Jan/2025