तबला, हार्मोनियम घेऊन सराव करा : गायिका मुग्धा भट-सामंत

पावस : सध्या अनेक गोष्टी आणि संदर्भ बदललेत. आम्ही नुसता तंबोरा लावून वाजवत तासनतास बसत होतो. त्याने बैठक पक्की होत असे. सध्या या गोष्टी खूप कमी आढळतात. मुलांकडे सहनशीलता कमी आहे. इलेक्ट्रॉनिक तंबोरा, तबला यावर सराव केला जातो. त्यामुळे मुलांना तंबोरा कसा लावतात (ट्यून करतात) याची माहिती नसते. प्रत्यक्ष तंबोरा, तबला यावर सराव नसल्यामुळे पुढे गाताना अडचण होते. संगीत शिकणाऱ्यांनी प्रत्यक्ष तबला, हार्मोनियम साथीदार घेऊन सराव केला पाहिजे, असे ज्येष्ठ गायिका मुग्धा भट-सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील गोळपकट्टाच्या ६३ व्या कार्यक्रमात रत्नागिरी येथील संगीत अलंकार, संगीतात एमए असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध गायिका मुग्धा भट-सामंत यांची मुलाखत आदिती काळे यांनी घेतली. भट-सामंत म्हणाल्या, मला बालवाडीपासून टेक्याचे ज्ञान आहे, असे वाटू लागल्याने लहानपणी आई, आजी यांनी गाण्याच्या शिकवणीला घातले.

एकाच ठिकाणी बसून रियाज करणे ही शिक्षा होती, दहावीनंतर होम सायन्सचे आकर्षण होते. प्रॅक्टिकलमुळे कॉलेज सकाळी सात ते संध्याकाळी सात असे व्हायला लागल्याने गाण्याच्या शिकवणीला वेळ मिळत नसे. त्यामुळे गाण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आईने बारावीनंतर आर्टस् घेण्याचा सल्ला दिला. पुढे एमए संगीत केले.

मुलांचा आणि पालकांचा लगेच कार्यक्रम करण्याकडे कल वाढला आहे. मुलांनी लवकर गाणे शिकायला सुरवात केली असेल तर काही वर्षांनी पक्की बैठक बसल्यावर कार्यक्रम करायला हरकत नाही; मात्र रियाज कायम असलाच पाहिजे. मी लग्न होऊन मुलगा तीन वर्षांचा झाल्यावर साधारण अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा कार्यक्रम केला. पहाटे चार वाजता रियाज सुरू व्हायचा, सध्या मुलांची जशी तयारी, चिकाटी, बैठक, इच्छा असेल त्याप्रमाणे मी त्यांना शिकवते.

शिकण्यासाठी अनेक शिष्यवृत्त्या
गायन किंवा कला शिकणे आर्थिकदृष्ट्या थोडे खर्चिक वाटते; पण भार कमी करण्यासाठी अनेक शिष्यवृत्या आहेत. मुलांनी त्याची माहिती करून घेतली पाहिजे. मला दादर-माटुंगा शिष्यवृत्ती मिळाली होती असे भट-सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 23/Jan/2025