लांजा कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे राज्याचे प्रधान सचिवांना पत्र

लांजा : लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा अर्थात डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांना सादर केले आहे. लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र हा प्रकल्प लोकवस्ती पासून जवळ असून प्रकल्पाकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. जलस्त्रोत जवळ आहेत. अशा जिल्हास्तरीय समितीने नाकारलेल्या प्रस्तावावर नगरपंचायत अडून बसली आहे. या विरोधात ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला असताना देखील जागेची खरेदी करण्यात आली असून या विरोधात ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडले होते. यावेळी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांना कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सादर केले आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांना यांच्याकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 01/Oct/2024