रत्नागिरी : गाळेधारकांनी नवीन भाजीमार्केटची इमारत केली मोकळी

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद मालकीच्या नवीन भाजीमार्केट मधील गाळेधारकांनी आपापले गाळे रिकामी करुन घेतले. न्यायालयाने दिलासा न दिल्याने नगरपरिषद अधिकाऱ्यांनी गाळे मोकळे करुन ताब्यात देण्यासाठी बुधवारी विनंती केली होती, त्यानुसार गुरुवारी गाळे मोकळे करून देण्यात आले.

र.न.प.च्या मालकीची नवीन भाजीमार्केट इमारत फारच जुनी झाली होती. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याबाबतची नोटीस देण्यात आली. या नोटीसविरुद्ध गाळेधारक न्यायालयात गेले होते. कायदेशीर कार्यवाही झाल्याशिवाय र.न.प. ने गाळे ताब्यात घेऊ नये अशी न्यायालयाने ताकीद द्यावी, यासाठी विनंती करण्यात आली होती. दिवाणी न्यायालयाने नुकताच या संदर्भात निकाल दिला.

यामध्ये गाळेधारकांचा विनंती अर्ज फेटाळून लावण्यात आला. र.न.प.च्या मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी गाळेधारकांना इमारत खाली करुन देण्यास सांगितले. त्यानुसार भाजीमार्केटच्या इमारतीतील आणि इमारतीबाहेरील गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यातील सामान, भाजी, फळे काढून घेतले. त्यामुळे आता लवकरच ही इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 24/Jan/2025