दापोलीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

दापोली : दापोली ची ओळख भारतरत्नांची भूमी, नररत्नांची खाण आणि सांस्कृतिक नगरी म्हणून आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पां. वा. काणे, महर्षी कर्वे इत्यादी भारतरत्न तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रँगलर परांजपे इत्यादी महापुरुषांच्या पदस्पर्शान, वास्तव्याने दापोलीचा परिसर पूनित झाला आहे. या बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात देखील अनेक कलाकार येथून घडले आहेत पाच पार्श्वभूमीवर दापोली सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित करत असणारा हा दापोली सांस्कृतिक महोत्सव कै. कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरे च्या मार्फत येत्या दिनांक 14. 15 ऑक्टोबर 2024 रोजी सर विश्वेश्वरय्या सभागृह कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे दिमाखात आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही दिवशी सायंकाळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 14 रोजी सायंकाळी 5:30 वा वारकरी दिंडीपासून या महोत्सवाला सुरुवात होईल. या नंतर शिवचरित्रावर आधारित “इथे मराठीचीये नगरी” हा मंदार परळीकर निर्मित सुप्रसिद्ध कार्यक्रम सादर होणार आहे. दिनांक 15 रोजी सायंकाळी 5.30 वा. दापोलीत स्थानिक लोककलेचे सादरीकरण व त्यानंतर जागतिक ख्यातीच्या गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या सुमधुर आवाजातील गायन प्रस्तूतीचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवाला जोडून दिनांक 14, 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 ते सायकाळी 5:00 या वेळेत कै. कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरे मार्फत विविध कलास्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धामध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या खालूबाजा, जाखडी नृत्य, भजन, कोकणातील लोककला, नाट्यछटा तसेच चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रील्स इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पैकी सांघिक स्पर्धासाठी प्रथम पारितोषिक रु.10 हजार, द्वितीय पारितोषिक रु. 7 हजार, तृतीय पारितोषिक रु. 5 हजार इतके देण्यात येणार आहे तसेच एकल स्पर्धेसाठी देखील रोख रक्कम पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे. या महोत्सवाला विधान परिषद आमदार मा. सौ. उमाताई खापरे, सुप्रसिद्ध कलाकार ओंकार भोजने यांसह अन्य कलाकार उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 01/Oct/2024

या महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रायोजकत्व मिळवून दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बिपिन दादा पाटणे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार तसेच विधान परिषद आमदार सौ. उमा ताई खापरे यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सक्रिय असणाऱ्या प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व सांस्कृतिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडणार असून समस्त दापोली तालुक्यातील जनतेला याचा आनंद लुटता यावा यासाठी हे आयोजन करत असल्याचे या कार्यक्रमाचे समन्वयक श्री. मिहीर दीपक महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच कार्यक्रमात दोन्ही दिवस उपस्थित राहण्याचे तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे.