रत्नागिरी : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना रत्नागिरी मतदारसंघात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उबाठा मधून आजवर तीन उमेदवार इच्छुक होते. यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, उबाठा सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आणि तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नावाचा समावेश होता. या इच्छुकांसोबत पक्ष प्रमुख उद्भव ठाकरे यांची चर्चा देखील झाली होती. मात्र आता पक्षातील दोन वरिष्ठ नेते इच्छुक असल्याने आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका तालुकाप्रमख बंड्या साळवी यांनी आता घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रत्नागिरीचे विद्यमान आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे मागील चार टर्म याच विधासभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. प्रत्येक टर्म ला त्यांचे मताधिक्य हे वाढत जाणारे आहे. तालुक्यातील केलेल्या भरगोस विकासकामांमुळे तसेच प्रत्येक मतदाराशी असणाऱ्या व्यक्तिगत संपर्कामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढणे हे येरागबळ्याचे काम नाही. उदय सामंत यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी उबाठा कडून अनेक दिवस शोधमोहीम सुरु आहे. लांजा राजापूर आमदार राजन साळवी तसेच आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यात महायुती म्हणून निवडणुका लढल्या गेल्यास रत्नागिरीची जागा शिंदे गटाकडे जाणार यावेळी बीजेपी मधील इच्छुक उमेदवार माजी आमदार बाळ माने हे उबाठात प्रवेश करतील व निवडणूक लढवतील असे देखील बोलले जात आहे. आता मात्र अशा परिस्थितीत उबाठा मधील तीन उमेदवारांपैकी एकाने माघार घेतली आहे.














