लांजा : कोकणात भात, नाचणी, वरी या रब्बी हंगामातील शेतीला बहर येत असतानाच पक्षी, वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडली असल्याने शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक संरक्षणार्थ उभारलेली बुजगावाणी सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
लांजा तालुक्यामध्ये भात पीक २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भात पीक, ८ हजार हेक्टर काजू तर ५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा पीक घेतले जाते. कोकणातील फळ पिकांच्या संरक्षण माणसे करत असतात तर रब्बी हंगामातील शेतीसाठी शेतकऱ्यांना बुजगावण्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. भात, नाचणी, वरी, अन्य भाजीपालाशेती करण्यात आली आहे. सध्या शेतीला बहर येत असून याच कालावधीत अनेक प्राण्यांचे व पक्ष्यांचे स्थलांतर झाल्याचे दिसून येते आहे. तयार झालेले भात पीक अन्न म्हणून नजरेस पडत असल्याने स्थलांतर झालेले हे प्राणी व पक्षांकडून शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. वन्यप्राणी डुक्कर, साळींदर आदी प्राणी शेतात घुसून शेतीची नासाडी करीत आहेत. पक्षी व प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी शेतामध्ये रंगीबेरंगी बुजगावणे उभी करून ठेवत आहेत. पूर्वीपासून सुरू असलेली बुजगावणे उभारण्याची पद्धत आधुनिक काळात आजही सुरू आहे. सध्या शेतामध्ये सर्वत्र ठीक ठिकाणी विविध प्रकारची बुजगावणे उभी केल्याचे दिसत आहेत. कापड, लाकडी काठ्या व तत्सम वस्तू वापरून तयार केलेले हे एक प्रकारे हे पुतळे आहेत. शेतात काठीचा आधार घेऊन शेती रक्षणासाठी माणसासारखी प्रतिकृती उभी केली जाते. दोन काठीचे अधिकचे चिन्ह उभे करून त्यावर शर्ट, पॅन्ट किंवा इतर कपडे वस्तू घालून मुखवटा तयार केला जात आहे किंवा फुटकी मडकी किंवा गोलाकार वस्तू वापरून चुना किंवा पांढरा रंग वापरून त्यावर डोळे, नाक आकार काढून मानवी चेहरे तयार केले जात आहेत. सध्या जिल्ह्यातील भातशेतीमध्ये सर्वत्र रक्षणकर्ती बुजगावणी सर्रास पहायला मिळत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 01/Oct/2024









