रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात दोन आठवड्यांत ड्रोनने टिपल्या १३ अवैध मासेमारी करणाऱ्या नौका

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा सागरी क्षेत्रात गस्त घालणाऱ्या ड्रोनने १० वाव अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करणाऱ्या आतापर्यंत १३ मच्छीमार नौका टिपल्या. या नौकामालकांवरील कारवाईच्या प्रकरणांचा लवकरच निकाल लागेल. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी अनंत पालव यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. गिलनेट मासेमारी नौकांना या कारवाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या नौकांची मासेमारी अवैध धरली जात नाही.

मिरकरवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनारी अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी १० जानेवारीपासून ड्रोन कॅमेराचे काम सुरु झाले.

तेव्हापासून मिरकरवाडा समुद्रात १० वावच्या आत मासेमारी करणाऱ्या १३ नौका दिसून आल्या आहेत. ड्रोन कडून मत्स्य आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडे अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांचे छायाचित्र जाते.

या नियंत्रण कक्षातून नौकाचे नाव, नंबर, किती अंतरात मासेमारी होत आहे यासंदर्भातील माहिती आणि छायाचित्र सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाला प्राप्त होतात. त्यानुसार संबंधित नौका मालकांवर कारवाई संदर्भात अभिनिर्णय अधिकाऱ्याकडे सुनावणी सुरु होते. ड्रोनने टिपलेल्या अशा १३ नौका मालकांवरची सुनावणी पुर्ण झाली असून सर्व प्रकरणे निकालावर असल्याचे अभिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांनी सांगितले. या कारवाईमध्ये ट्रॉलींग, पर्ससिन नेट आणि गिलनेट नौका मालकांचाही समावेश आहे. गिलनेट नौका मालकांनी सुनावणीवेळी संबंधित मासेमारी नौका असल्यासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे या नौका मालकांना दंडात्मक कारवाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 25/Jan/2025