लांजा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फेरतपासणी अधिकारी तथा राजापूर तहसीलदार यांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड (क्षेपणभूमी) प्रकल्प जागेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अपेक्षित होते; पण लांबूनच केवळ नजर पाहणी करण्यात आल्याने फेरतपासणी करण्याचा शासनाकडून केवळ दिखावा केला जात आहे का? असा सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार डम्पिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी ग्रामस्थांना सोबत घेऊनच करावी, अन्यथा, या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
कोत्रेवाडी येथे वस्तीलगत लांजा नगरपंचायतीमार्फत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पाची जागा ही शासनाच्या २०१६ च्या निकषांत बसत नाही, अशा आशयाचे पत्र देखील दिलेले आहे.
लांजा नगरपंचायतीकडून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अगोदर ग्रामस्थ आणि विल्हाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली होती. या बैठकीनंतर जिल्हा सहआयुक्त, रत्नागिरी तुषार बाबर यांनी या प्रकल्पाच्या जागेची फेरतपासणी करण्याचे पत्र राजापूर तहसीलदार यांना दिले होते, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार यांची भेट घेतली.
त्यानी सांगितले की, मी गुरुवारी सायंकाळी या जागेची पाहणी केली आहे; मात्र यावेळी ग्रामस्थांनी आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे का, असा सवाल केला, आपण दुरून ही पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. ग्रामस्थांच्या आग्रही मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसीलदार यांनी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊनच फेरतपासणी करावी, अशी मागणी केली. मात्र, आपणास शक्य झाले तरच आपण जाऊ, असे त्यांनी सांगितले.
शासनाकडूनच धूळफेक
अशा प्रकारे पाहणी केली जात असेल तर शासनाकडून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी राज्य निवडणूक निरीक्षक (पोलिस) राजेंद्र प्रसाद मिना, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी या प्रकल्पाच्या जागेची ग्रामस्थांसोबत स्थळ पाहणी करून ग्रामस्थांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे जिल्हा निवड समितीने २०२१ मध्ये कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड जागेची पाहणी करून सदर जागा अयोग्य असल्याचे दिलेले पत्र ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दाखवले असता त्यांनी ते न स्वीकारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 25/Jan/2025














